कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाच्या विरोधात लागल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच विरोधी पक्ष आडाखे बांधू लागले आहेत. त्यासंदर्भातल्या नियोजनासाठी बैठकाही होऊ लागल्या आहेत. यासंदर्भात रविवारी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक झाली. मात्र, एकीकडे मविआच्या बैठका होत असताना दुसरीकडे पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. पक्षाचे माजी आमदार आणि पुरंदरमधील महत्त्वाचे नेते अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एबीपीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळेंना फटका बसणार?

बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरमधली मतं महत्त्वाची ठरतात. गेल्या लोकसभा निवडणुकीतही पुरंदर विधानसभा मतदारसंघातली मतं सुप्रिया सुळेंसाठी महत्त्वाची ठरली होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्याच एका महत्त्वाच्या नेत्यानं पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्यानं जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुरंदर राष्ट्रवादीमध्ये यामुळे मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सुप्रिया सुळेंना तालुक्यातील मतांची जमवाजमव करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असं बोललं जात आहे.

मविआमध्ये कसं होणार जागावाटप? अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “काहींना असं वाटतंय की…!”

अशोक टेकवडेंनी सांगितलं कारण…

दरम्यान, अशोक टेकवडेंनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. “मी निर्णय घेतलाय की भाजपामध्ये प्रवेश करायचा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला. शिवाय माझी त्यांच्याबरोबर समोरासमोर बैठकही झाली. माझ्या लक्षात आलं की पुरंदरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काम करण्याची संधी आहे. देवेंद्र फडणवीसांनी ३०-३५ मिनिटांच्या आमच्या चर्चेत मला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला योग्य वाटल्या. म्हणून मी हा निर्णय घेतला”, असं अशोक टेकवडे यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणतात, “यामागे इतरही कारणं आहेत!”

दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “त्यांच्या या भूमिकेमागे इतरही काही कारणं आहेत. ती कारणं तु्म्ही त्यांनाच विचारली तर बरं होईल. कारण मध्ये त्यांच्याकडे आयटी विभागाची धाड पडली. तेव्हा काही कागदपत्रं तिथे मिळाली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे हे असं घडल्याचं ऐकायला मिळतंय”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ek mla ashok tekwade join bjp big blow to supriya sule in baramati pmw
First published on: 15-05-2023 at 14:37 IST