गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्वीटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेतचा एक फोटो आव्हाडांनी ट्वीट केला होता. त्यावरून बावनकुळेंना टोलाही लगावला होता. मात्र, आव्हाडांचा दावा चुकीचा असल्याचं बावनकुळेंनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावरून दावे-प्रतिदावे होत असताना आव्हाडांनी ते ट्वीट डिलीट केलं. आता त्यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, ते ट्वीट करण्यामागचं कारणही आव्हाडांनी दिलं आहे.
नेमका वाद काय?
दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंचा एक पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरायला सुरुवात केली होती. यावर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरलं होतं. या ट्वीटमध्ये आव्हाड यांनी एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिसत आहेत. याच फोटोचा आधार घेत आव्हाड यांनी ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ असं खोचक ट्वीट केलं होतं.
बावनकुळेंनी खोडून काढला दावा
मात्र, यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण देताना हा दावा फेटाळून लावला. “जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबजी यांच्या कबरीवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट केली. जे. पी. नड्डा, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्ग्यावर गेलो. तिथल्या मुस्लीम परिवारांनीही आमच्यासह दर्शन घेतलं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय ट्वीट केलं? ते भूगोल विसरलेत का? ते म्हणतात औरंगजेबाच्या थडग्याचं दर्शन घेतलं. इतका नीचपणा?” असं म्हणत बावनकुळेंनी आव्हाडांना परखड सवाल केला होता.
दरम्यान, यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ते ट्वीट डिलीट केलं. त्यावरून भाजपाकडून खोचक टीका सुरू होताच आव्हाडांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आम्ही दर्ग्यावर गेलो की आम्ही मुसलमान धार्जिणे..मग “जीतुदिन”, “हा हिंदु द्वेष्टा” म्हणायचं. घाणेरडे फोटो, घाणेरड्या पोस्ट टाकायच्या. ‘औरंगजेबजी’वरुन किती धावपळ? आम्ही बोललो असतो तर बाप रे बाप .. मला माहीत आहे ती संतांची मझार आहे .. पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते’, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.
आव्हाडांचं खोचक ट्वीट
तसेच, “जो तुम करते हो वो हम भी कर सकते हैं… लेकीन हम करते नही है …तुम करो तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला..दो उडतें तीर से इतने घायल, कभी मीलोगे तो हमारे जखमो के अनगीनत निशान देख लेना”, अशा प्रकारे शेरच्या माध्यमातून आव्हाडांनी टोला लगावला आहे.