“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक गोष्टी आपल्या मनात ठेवतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडे पाहून पूर्वीच्या ग्राइप वॉटरच्या जाहिरातीची आठवण येते. त्यात एक मुलगा दाखवायचे तो मुलगा म्हणजे लहानपणीचे देवेंद्र फडणवीसच होते,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली.
“ग्राइप वॉटरच्या जाहिरातीत दाखवण्यात येणारं बाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याशी साधर्म्य आहे. मी त्यांना याबाबत खासगीतही सांगितलं आहे. तो तुमचाच लहानपणीचा चेहरा असं त्यांना सांगितलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीस आपल्या चेहऱ्यावर काही दाखवत नाहीत, काही बोलतही नाहीत. परंतु वेळ आल्यावर बरोबर पाहून घेतात,” असं पवार यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.
आणखी वाचा- “आरेतल्या झाडांवर धनुष्यातून सोडला कमळाचा बाण”
याचं उदाहरण देताना त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा उल्लेख केला. “मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्ष दीड वर्ष जोरात जाऊ दिलं, सर्व कामं करू दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली आणि त्यानंतर अमित शाह यांचा फोन आला. त्यानंतर त्यांनी खडसेंना निर्दोष सिद्ध होत नाही तोवर मंत्रिपदावरून बाजूला हटण्यास सांगितलं आणि आता तर तिकिटही कापलं. खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचं त्यांच्यासमोर काही चाललं नाही. त्यांच्या बाजूचे एक-एक आमदारही आता बाजूला झाले. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या जवळच्या लोकांना उभं केलं. कोण आपल्याला अडचणीचा ठरणार आणि त्याला कसं कापायचं हे ते पाहतात,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.