scorecardresearch

एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”

“आपल्यावर जवाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं…”, असेही अजित पवारांनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”
मंगलप्रभात लोढा अजित पवार ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर अद्याप पडदा पडला नाही. तोच भाजपा नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या विधानावरून मंत्री लोढा यांच्यावर टीका केली आहे.

किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या बंडाची आग्र्यातून शिवरायांच्या सुटकेशी तुलना करणाऱ्या लोंढाच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा :

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं.

यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले आहेत. “वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जवाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांची कानउघडणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:17 IST

संबंधित बातम्या