राजकीय धक्कातंत्राने राष्ट्रवादीत खळबळ; शरद पवारही अनभिज्ञ, निवडलेल्या वेळेवरून संशय वाढला
मुंबई : अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी आपल्याशी काहीही चर्चा केली नव्हती. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात आपल्याविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होऊन त्यांनी राजीनामा सादर केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून समजल्याचाो दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असला, तरी अजितदादांच्या मौनामुळे या राजीनाम्याबाबत संदिग्धता कायम आहे.
अजितदादांची समजूत काढण्याचे प्रयत्न पवारांनी सुरू केले असून त्याला कसे यश मिळते यावरच पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा सादर केला. हा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लगेचच स्वीकृत केला. राजीनाम्यानंतर अजितदादांचा कुणाशीच संपर्क झाला नव्हता. पक्षांतर करणारे नेते आधी आमदारकीचा राजीनामा सादर करतात. या पाश्र्वभूमीवर अजितदादांच्या राजीनाम्यावरून विविध तर्कवितर्क सुरू झाले. अजितदादांमुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक पुतण्या बंड पुकारणार असा संशयही व्यक्त करण्यात येत होता.
अजितदादांनी राजीनाम्यासाठी निवडलेल्या वेळेवरून संशय आणखीनच वाढला. कारण राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात ‘ईडी’ने शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने गेले दोन-तीन दिवस मरगळलेल्या राष्ट्रवादीला काहीशी उभारी मिळाली होती. शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे जाहीर केल्याने वातावरणनिर्मिती झाली होती. पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे टाळावे म्हणून सरकारच्या वतीने प्रयत्न झाले आणि शेवटी पवारांनी जाण्याचे टाळले. यातून राष्ट्रवादीला प्रसिद्धी मिळाली असताना, अजितदादांनी त्याच दिवशी सायंकाळी राजीनामा सादर केल्याने संशय बळावला आहे. अजितदादांनी हीच वेळ का निवडली असावी, यावरून अंदाज बांधले जाऊ लागले.
अजितदादांनी टोकाचे पाऊल का उचलले असावे?
सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात अजित पवार हे आरोपी असल्याने भाजप किंवा शिवसेना त्यांना जवळ करण्याची शक्यता नाही. कारण भाजप वा शिवसेनेसाठी ते अधिक त्रासदायक ठरेल. स्वतंत्र गट स्थापन करण्याची वेळही गेली आहे. कारण निवडणूक अगदीच तोंडावर आली आहे. पक्षात दबाव वाढविण्याकरिताच हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जाते. उमेदवारांची नावे निश्चित करताना किंवा अन्य बाबींमध्ये डावलले गेल्याने अजितदादा नाराज असावेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांबरोबर जागावाटपाची चर्चा झाली तेव्हा काही जागांवरून ते भलतेच आक्रमक होते, असा अनुभव काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितला. शीघ्रकोपी अजितदादांनी यापूर्वीही काही वेळा टोकाचे पाऊल उचलले होते. सिंचन घोटाळ्यात आरोप होताच कोणालाही न सांगता उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नंतर पुन्हा मंत्रिमंडळात परतले होते. २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यावरही मुख्यमंत्रिपदाचा आग्रह पक्षाने सोडून दिल्यावर अजितदादांनी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती.
राजीनाम्यापूर्वी अजितदादांनी कोणाशीही चर्चा केली नव्हती. तसेच राजीनाम्यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे. राजकारणाची पातळी घसरल्याने मुलांनाही त्यांनी शेती वा उद्योग करण्याचा सल्ला दिला. अजितदादांशी माझा अद्याप संपर्क झालेला नाही, पण त्यांच्याशी चर्चा केल्यावर नक्की अंदाज येईल. कुटुंबप्रमुख म्हणून पवार कुटुंबामध्ये माझाच शब्द अंतिम असतो. आमच्या कुटुंबात कोणतेही वाद नाहीत. – शरद पवार
नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू
* अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचे सारे प्रयत्न शरद पवार यांनी सुरू केले आहेत.
* शरद पवार हे बहुधा शनिवारी अजितदादांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. यातून मार्ग निघेल, यावर पवार हे आशावादी आहेत.
* पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत अजितदादांना पूर्वीप्रमाणे महत्त्व मिळत नव्हते. अजितदादांच्या राजीनामानाटय़ावर भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे बारीक लक्ष आहे.
अजित पवारांच्या भाजपप्रवेशाची शक्यता नाही- मुनगंटीवार
अजित पवार यांनी राजीनामा का दिला हे अजून स्पष्ट झालेले नाही. कारण काहीही असो अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता दूरपर्यंत दिसत नाही. अजित पवारच त्यांच्या पुढील वाटचालीबाबत सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
काही तरी घडतंय.बिघडतंय
काही तरी घडतंय.बिघडतंय, कोणी राजीनामा देतंय, कोण पक्ष सोडून जातंय..देशात आणि राज्यात पारदर्शक कारभार सुरू होताच..झाकलेलं बरंच उघडं पडतंय, सिंचनाचं मुरलेलं पाणी हळूहळू बघा आता मोठय़ा मोठय़ा धरणातून कसं बाहेर पडतंय, काहीतरी घडतंय काहीतरी ‘बि’घडतंय? असे सूचक ट्विट भाजपचे नेते व शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर केले आहे.
आज मुंबईत आदरणीय पवार साहेबांना मोठय़ा संख्येने मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील, याची खात्री आहे. – अजित पवार