नव्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश न केल्याने राष्ट्रवादीतील एक गट नाराज होता. आता ही नाराजी दूर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून त्यांनी आज राजभवनात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचं मंत्रिमंडळात स्वागत केलं. दरम्यान, नाराजीनाट्य दूर झाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या संभाव्य खात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले समता परिषद आणि माझ्या मतदारसंघातील सर्वांचे आभार मानतो.”

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले, ” खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मी सर्व विभाग सांभाळले आहेत. त्यामुळे कोणताही विभाग मिळाला तरी चालेल. जो विभाग मिळेल तो सांभाळेन”, असं छगन भुजबळ म्हणाले. “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून ते रडत आहेत यासंदर्भात मी सरकारशी बोलणार आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांना मिळणार?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. छगन भुजबळ यांना हेच दिलं जाईल अशी चर्चा रंगली आहे. आता नेमकं छगन भुजबळांना कुठलं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अखेर भुजबळ यांची नाराजी दूर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे. अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. या संयमाचं फळ त्यांना मिळालं आहे असंच म्हणता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.