उदयनराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी काय करायचे हे आम्ही सांगू शकत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छत्रपती उदयनराजे यांच्या यात्रेच्या अनुपस्थितीवरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, “उदयनराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी काय करायचे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांची इच्छा असेल तर ते आमच्या यात्रेत संध्याकाळी सामील झालेले आपल्याला दिसतील”.

यावेळी जयंत पाटील यांनी शिवेसना आणि भाजपावरही जोरदार टीका केली. “भाजपाची अवस्था भस्मासुरासारखी झाली आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता ती शिवसेनेच्या मुळावर उठणार आहे. त्यांना देशात कोणताही दुसरा पक्ष नको आहे .भाजपाचे काँग्रेसीकरण झाले असून ज्यांनी पक्षासाठी काम केलं आहे ते लोक सतरंज्या उचलण्याचे काम करीत आहेत आणि आम्ही मोठे केलेले लोक त्यावर जाऊन सत्तेची गणिते आखत आहेत”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

“भाजपा सरकारने केवळ आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केली आहे. काहीजणांना अमिष, भिती दाखवली जात आहे, पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, भाजपामधील निष्ठावंत सतरंजी उचलत असून आमच्या येथुन गेलेले सत्तेच्या खुर्चीवर बसलेत आहेत”, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.