माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी जितेंद्र आव्हाडांना अटक केली होती. आज शनिवारी न्यायालयाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.

जामीन मंजूर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आपल्याला किमान एक दिवस तरी तुरुंगात टाकायला पाहिजे, यासाठी षडयंत्र रचलं होतं. त्यासाठी विशिष्ट कलमं लावण्यात आली होती, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. “मला अटक करणारे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आव्हाड म्हणाले, “पहिल्यांदाच एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा माझ्या अटकेशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलत दर मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे पोलीस अधिकारी हतबल झाले होते. कारण असं अचानक कुणी कुणाला ताब्यात घेत नाही.”

हेही वाचा- दिलासा! ‘हर हर महादेव’ राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

“मला कलम ४१ (अ) अन्वये जी नोटीस देण्यात आली होती, ती नोटीस मला दुपारी दोन वाजता देण्यात आली होती. त्यामध्ये तुम्ही पाच वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा, असं सांगण्यात आलं होतं. पण त्याआधीच म्हणजे अडीच वाजताच मला अटक करण्यात आली. नोटीस दिल्यानंतर ७२ तासांच्या आत कुणालाही अटक करता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे. मात्र, माझ्या प्रकरणात हा नियम पाळला नाही,” असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

हेही वाचा- “काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर…” जामीन मिळताच आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी सांगितलं की, माझ्यासह एकूण १२ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पण केवळ मला जारी केलेल्या नोटीशीवर ‘क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट- १९३२’ च्या सेक्शन ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बाकी ११ जणांवर हे कलम लावण्यात आलं नाही. मला एखादा दिवस तुरुंगात ठेवायचं असेल तर कोणतं कलम लावावं? असा विचार करून हे कलम टाकण्यात आलं होतं. यांना तक्रारदार मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलीसच्या कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.