कर्नाटकचा निकाल ही भाजपाच्या पार्श्वभागावर मारलेली लाथ आहे. लोकांना सूडाचं राजकारण आवडत नाही. त्यामुळे मतपेटीतून आपला राग लोकांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था महाराष्ट्रात होईल अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नाहीतर तर ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत. ठाण्यात ते दडपशाही करत आहेत असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
काही वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा भाजपाची अवस्था कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था होणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे. १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात काँग्रेसचा विजय झाला आहे भाजपाला दारुण पराभव झाला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपावर कडाडून टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. हेमंत वाणीही तडीपार होतील अशीही माहिती समोर येतं आहे. या कारवाईमुळे ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पाठिशी राज्य सरकार आहे असाही आरोप होतो आहे. यावरूनच मुख्यमंत्री दडपशाही करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.