सोलापूर : राष्ट्रवादीपासून दुरावत भाजपशी जवळीक साधलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दर्शनाच्या निमित्ताने येथे येत बंद खोलीत चर्चा केली. मोहिते-पाटील यांनी सध्या थेट भाजपात प्रवेश केलेला नसला, तरी त्यांच्या संपर्कातूनच सध्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप-सेनेचा मार्ग पत्करला आहे. टोपे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर या दोघांची आज येथे झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयसिंह मोहिते-पाटील हे आज अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आले होते. योगायोगाने याचवेळी माजी मंत्री राजेश टोपे हे देखील सपत्नीक दर्शनासाठी आले होते.

स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व आरती झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांचा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी महावस्त्र देऊन सत्कार केला.

दर्शन,आरती आणि सत्कार आटोपल्यानंतर मोहिते-पाटील व टोपे यांच्यात देवस्थानाच्या कार्यालयात बंद खोलीत चर्चा झाली. त्या वेळी अन्य व्यक्ती उपस्थित नव्ह’ती.

लोकसभा निवडणुकांपाठोपाठ आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयारामांची गर्दी होत आहे.

मोहिते-पाटील घराण्याने लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादीशी काडीमोड घेत भाजपशी घरोबा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पट्टय़ात त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर मोहिते-पाटील व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची अक्कलकोटमध्ये योगायोगाने भेट झाल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader rajesh tope meeting with vijaysinh mohite patil in close room zws
First published on: 17-08-2019 at 02:56 IST