“शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण या सरकारनं कोकणाला काय दिलं? विदर्भाला केवळ १६ कोटी रूपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसतंय तरी कुठे? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी “राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात,” असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला.
“राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा,” असं म्हणत रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून फडणवीसांवर निशाणा साधला.
‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’ असं म्हणताना @Dev_Fadnavis साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात…
कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय…
पण आता येत्या #GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2020
काय म्हणाले होते फडणवीस?
“शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण या सरकारनं कोकणाला काय दिलं? विदर्भाला केवळ १६ कोटी रूपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसतंय तरी कुठे? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार आहे तरी कुठे? मागील वर्षी पिकलं ते खरेदी केलं नाही. आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते. आता ते आता कुठे गायब झाले आहेत? लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावं, असंही ते म्हणाले होते.