राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मूडबद्दल मोठ विधान केलं आहे. “केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही? त्याची तुलना का करत नाही?,” असा प्रश्न उपस्थित करत “लोकांना नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे,” असं मत पवार यांनी व्यक्त केलं.

राज्यात महाविकास आघाडीच गणित जुळवून आणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा राजकीय प्रयोग केला. मोदींनी आपल्या ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी सत्तास्थापनेनंतर केला होता. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत याच मुद्यावर बोलताना पवार यांनी केंद्रातील सत्ताबदलाविषयी भाष्य केलं.

पवार म्हणाले,”ते (नरेंद्र मोदी) त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही ती त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्या टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का?,” असं पवार म्हणाले.

पर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष कुणाचा? याप्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, “मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की ‘अ’ (मोदी) हा चुकीचा आहे आणि ‘अ’ (मोदी) ला ‘ब’ उत्तर देऊ शकतो. मी असं केलं आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात,” असंही पवार यावेळी म्हणाले.

कांद्याच्या दरवाढीविषयीही दिला होता इशारा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव कांद्याला दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. आता आपल्याला तुर्कीतून कांदा आयात करावा लागत आहे आणि कांदा आयात करून केंद्र सरकारने नक्कीच चूक केली आहे. या सगळ्यांविषयी मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. त्यात हे असं घडेल असा इशारा दिला होता,” असं पवार यांनी मुलाखतीत सांगितलं.