scorecardresearch

“अजित पवार शिंदे गटात आले तर आनंद,” केसरकरांच्या विधानावर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लांडगे, कोल्ह्यांच्या टोळीत…”

“अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार,” राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठं विधान

“अजित पवार शिंदे गटात आले तर आनंद,” केसरकरांच्या विधानावर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लांडगे, कोल्ह्यांच्या टोळीत…”
"अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार," राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठं विधान

अजित पवारांनी पहाटेच्याऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर ते आता मुख्यमंत्री असते असं विधान भाजपा आमदार प्रवीण पोटे यांनी केलं आहे. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली असून अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद आहे असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितलं आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“केसरकरजी आपण हे विसरलात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याच्या राजकारणाचे सिंह आहेत. ‘शेर अपना इलाका कभी नही छोडता’ म्हणून त्यांना कुठल्याही लांडग्या कोल्ह्याच्या टोळीमध्ये समाविष्ट होण्याची आवश्यकता नाही,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

“अजित पवार शिंदे गटात…”, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होतेय म्हणत बंडखोर आमदाराचं विधान

पुढे ते म्हणाले की “भाजपाचे आमदार प्रवीण पोटे हे असे म्हणाले की, अजित पवारांनी जर सकाळच्या ऐवजी दुपारी शपथविधी घेतला असती तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, पण ती वेळही आमची असेल आणि पक्षही असेल”.

नेमकं प्रकरण काय आहे?

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे शनिवारी अमरावतीत एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रवीण पोटे यांनी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलं होतं. अजित पवारांनी पहाटेच्याऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर ते आता मुख्यमंत्री असते, असं विधान पोटेंनी केलं. पोटे यांच्या विधानाबाबत दीपक केसरकरांना विचारलं असता, अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल, असं विधान केलं. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

प्रवीण पोटेंच्या विधानावर भाष्य करताना दीपक केसरकर म्हणाले की “राजकीय नेत्यांची राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांशी मैत्री असते. एकमेकांबद्दल आदर असतो. आम्हाला सगळ्यांना अजित पवारांबद्दल आदर आहे. अजित पवारही कुटुंबातील सदस्याप्रमाणे मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे मला वाटतं की, प्रवीण पोटे यांनीही मैत्रीपोटी किंवा आदरापोटी ते विधान केलं असावं. अजित पवार आमच्या सगळ्यांबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे असा उमदा नेता आमच्याबरोबर आला तर का आवडणार नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 11:14 IST

संबंधित बातम्या