scorecardresearch

आमदार नीलेश लंके उपस्थित, तर आमदार संग्राम जगताप अनुपस्थित ; महत्त्वाच्या प्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची दांडी

मोक्याच्या वेळी राष्ट्रवादीच्या नगर जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनी गैरहजर राहणे पसंत केल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा होत आहे.

ncp mla nilesh lanke sangram jagtap
आमदार नीलेश लंके व आमदार संग्राम जगताप

नगर : विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे पारनेरमधील आमदार नीलेश लंके काल, रविवारी अनुपस्थित राहिले. त्यापाठोपाठ आज, सोमवारी राष्ट्रवादीचेच नगर शहरातील आमदार संग्राम जगताप सरकारच्या बहुमत चाचणीच्या मतदानासाठी अनुपस्थित राहिले. मोक्याच्या वेळी राष्ट्रवादीच्या नगर जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनी गैरहजर राहणे पसंत केल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा होत आहे.

बहुमत चाचणीसाठी आपण वेळेत सभागृहात पोचू शकलो नाही. आपण पोहोचण्यापूर्वीच सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. असा प्रकार इतरही काही आमदारांबाबत झाला आहे. आम्ही सर्व आमदार सभागृहाबाहेरील वऱ्हांडय़ात उपस्थित होतो, असे स्पष्टीकरण आमदार जगताप यांनी दिले आहे. कालची आमदार लंके यांची अनुपस्थिती व आजची आमदार जगताप यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरली. त्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे. मात्र त्यात वेगळे काही नाही, केवळ वेळेत पोहोचू शकलो नाही एवढाच मुद्दा आहे, असा दावा आमदार जगताप यांनी केला. 

आपण शिरूर (पुणे) येथील रुग्णालयात दाखल होतो, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी उपस्थित राहू शकलो नाही, मतदान करू शकलो नाही, त्याची पूर्वकल्पना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती, असा खुलासाही आमदार लंके यांनी केला. आमदार लंके व आमदार जगताप हे दोघेही राष्ट्रवादीचे असले तरी दोघांमध्ये फारसे सख्य नाही. मात्र दोघांच्या अनुपस्थितीने साम्य साधले आहे. आमदार जगताप यांचे नगर शहरातील भाजपशी सौहार्दाचे संबंध आहेत. भाजप खासदार सुजय विखे यांच्याशी जगताप यांचे विशेष सलोख्याचे संबंध आहेत. त्यातून दोघे अनेकदा नगर शहरात एकत्र कार्यक्रम घेतात.  आमदार लंके व आमदार जगताप यांच्या अनुपस्थितीची चर्चा होत असली तरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp mla nilesh lanke sangram jagtap maharashtra floor test vote of confidence zws

ताज्या बातम्या