Eknath Shinde Delhi Visit: गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ऐन अधिवेशनाच्या गडबडीत उपमुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात महत्त्वाची विधेयके चर्चेला येण्याची शक्यता असूनही एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे त्यामागे नेमकं काय कारण होतं? यावर तर्कवितर्क चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले?
आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याचा दावा केला. “एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबीयांनादेखील प्राप्तीकर विभागानं काही नोटिसा पाठवल्या आहेत. कदाचित एकनाथ शिंदेंना असं वाटत असेल की आतल्याआत काही कुरघोड्या होत आहेत का? त्याचीच स्पष्टता घेण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असावेत”, असं रोहित पवार म्हणाले.
“अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडे प्राप्तीकर विभागाच्या नोटिसा जात नाहीत. पण एकनाथ शिंदेंकडेच या नोटिसा जातात हे मात्र अभ्यास करण्यासारखं आहे. कदाचित मुंबई महानगर पालिकेसाठी एकनाथ शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय असं चित्र आता दिसतंय”, असंही ते म्हणाले.
संजय राऊतांची सूचक पोस्ट
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सूचक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. “गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शाह यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुवत आहेत असे दाखवले गेले होते. दिल्लीत गुरु अमित शाह यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!”, असं या पोस्टमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे.
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची का होतेय चर्चा?
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर होणारी चर्चा ही प्रामुख्याने या दौऱ्याच्या पार्श्वभूमीमुळे होत असल्याचं जाणकारांचं मत आहे. एकीकडे महाराष्ट्रात राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नेमकी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती आकाराला येत असल्यामुळे त्याचं महायुतीसाठी किती आव्हान ठरू शकेल? यासंदर्भात अंदाज लावले जात आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे सहकारी संजय शिरसाट यांना प्राप्तीकर विभागानं नोटीस पाठवल्यामुळे त्यावरही चर्चा चालू आहे.
संजय गायकवाड यांनी कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असताना खुद्द मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचं नमूद केलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.