महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे. एवढच नाहीतर सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकारने केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा हे महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे. आसाम सरकारच्या या दाव्यावरून आता विरोधी पक्षांकडून आसाम सरकार आणि भाजापवर जोरदार टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

“भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग सहावं नसून ते आसाममध्ये असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यामुळं राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय.” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळेंनी दिला पुरावा –

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढच्या ट्विटमध्ये सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचा पुरावा देखील दिला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात सुळे यांनी लिहिलं आहे की, “श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.”