शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर दोन आठवड्यांपूर्वी ईडीनं मोठी कारवाई केली. आता त्यापाठोपाठ रोहित पवारांना ईडीनं समन्स बजावल्यानंतर ते स्वत: ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. रोहित पवार यांची एकीकडे ईडीकडून चौकशी चालू असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. रोहित पवार बुधवारी सकाळी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जात असताना सुप्रिया सुळेंनी त्यांना राज्यघटना भेट म्हणून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.

“हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा”

सध्याचा काळ शरद पवार गटासाठी आणि एकूणच विरोधकांसाठी संघर्षाचा असल्याची भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली आहे. “सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हानं येत राहतील. आम्ही आव्हानांवर मात करून संघर्ष करू. पण सत्याच्याच मार्गाने चालू हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढे नेण्याचं काम शरद पवारांनी गेली ६ दशकं केलं आहे. त्याच महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमची ही लढाई आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

संसदेतील आकडेवारीचा दिला संदर्भ

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी यावेळी सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारनेच संसदेत नमूद केलेल्या आकडेवारीचा संदर्भ दिला. “दुर्दैवाने अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. संसदेत केंद्र सरकारची अधिकृत माहिती असं सांगते की प्राप्तीकर विभाग, सीबीआय आणि ईडी यांच्या ९० ते ९५ टक्के केसेस विरोधी पक्षांवर आहेत. त्यामुळे रोहितला नोटीस येणं आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. रोहित नवीन पिढीसाठी काहीतरी करू इच्छितो. त्यामुळे कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी चर्चा माझ्या कानांवर येत आहे”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

“अजित पवार शरद पवारांचं ऐकत नव्हते, आता पंतप्रधानांचं ऐकत नाहीत, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवारांची चौकशी, शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन?

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे जमून शक्तिप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. हा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळून लावला. “आम्ही इथे जमणं हे शक्तीप्रदर्शन नाही. काही बाबतीत प्रेमही असतं, नातीही असतात. जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला भाऊ खंबीरपणे लढतोय तर त्याच्यासाठी आपण यावं. तर त्यात गैर काय? आम्ही या संघर्षाच्या काळाचा ताकदीने, सत्याच्या मार्गाने सामना करू”, असा निर्धार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.