भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचं दिसून येत आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं, असं रोहित पवार टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून आरोप

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून पडळकरांनी टीका केली होती. त्यावरून रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. “गोपीचंद पडळकर वेगवेगळ्या आंदोलनात व्यस्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी अराजकीय स्वरूपाचा कार्यक्रम घेण्याचा विचार त्यांच्या मनात आलाच नाही”, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

“गोपीचंद पडळकर जेव्हा अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करतात, तेव्हा ते खालच्या दर्जाचं राजकारण करतात. धनगर समाजाच्या युवा वर्गालाही त्या गोष्टी आवडलेल्या नाहीत. ते चौंडीला अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीनिमित्त आले, तेव्हा एकछंद गोपीचंद अशा घोषणा होत होत्या. वास्तविक तिथे अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषणा व्हायला हव्या होत्या. त्यांनी भाषणात फक्त टीका केली. नगर जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या पत्रात राजकारणच लिहिलंय. खाली एका ओळीत नाव बदलाची इच्छा व्यक्त केली आहे”, असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

“…त्यामुळे आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये”; तुमच्या घरातून CM कोण होणार विचारणाऱ्या BJP नेत्याला रोहित पवारांचा टोला

“मोठे नेते पडळकरांची पाठराखण करतात”

“आपल्या कुटुंबातही जेव्हा लहान मुलं एखाद्या मोठ्या व्यक्तीला चुकून बोलतात, तेव्हा आई-वडील त्याला सांगतात तू गप, तू लहान आहेस. जेव्हा भाजपाचा एक नेता असा सुसाट सुटतो आणि त्यांच्यासोबत इतरही आजी-माजी आमदार असतात, जे विचित्र पातळीवर जाऊन मोठ्या नेत्यांच्या बाबतीत टीका करतात. त्यावेळी त्यांचे मोठे नेते शांत बसतात. टीका करणाऱ्या लोकांना मोठे नेते सहकार्य करतात, त्यांची पाठराखण करतात”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावरच्या केसेस बघितल्या तर दिसेल. त्यांचे ठराविक कार्यकर्ते सोडले, तर त्यांच्या आरोपांना कुणीही महत्त्व देत नाहीत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी या लोकांना आवरलं पाहिजे”, असं ते यावेळी म्हणाले.