राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचं एक ट्वीट सध्या चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी एक बातमी शेअर केली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने आपलं बोट तोडून घेतलं आहे. पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे त्याने भारतीय जनता पार्टीला मत दिलेलं बोट कापलं आहे. ही बातमी शेअर करत रोहित पवारांनी ‘स्वत:चं बोट कापू नका’ असं आवाहन मतदारांना केलं आहे.
“हे भयानक आहे! असं करू नका बाबांनो! बोट न तोडता येणाऱ्या निवडणुकीत योग्य पक्षालाच मत देऊन भाजपाचा सत्तेतून कडेलोट करण्याची आज खरी गरज आहे. माझी सरकारलाही विनंती आहे की, त्यांनी या कार्यकर्त्याला न्याय द्या”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे माजी स्वीय साहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. ननावरे यांनी आत्महत्या केल्यानंतर उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी ननावरे यांनी एक चित्रफीत तयार केली होती. यात त्यांनी काहीजणांची नावे घेतली होती. या व्हिडीओच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. याचा पाठपुरावा मृत नंदकुमार ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे करत होते. पण धनंजय ननावरे यांनी आता आपलं बोट तोडून घेतलं आहे.
हेही वाचा- ननावरे दाम्पत्य आत्महत्येप्रकरणी आमदार बालाजी किणीकर यांच्या पीएसह चारजण अटकेत
भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस संथ गतीने तपास करत आहेत. पोलीस न्याय देऊ इच्छित नाहीत, असा आरोप धनंजय ननावरे यांनी केला. यानंतर त्यांनी स्वतःचं बोट तोडून घेतलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत दर आठवड्याला शरीराचा भाग तोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचं धनंजय ननावरे यांनी सांगितलं आहे. या प्रकारानंतर खंडणी विरोधी पथकाने चारजणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय साहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि गणपती कांबळे यांचा समावेश आहे.