अहिल्यानगर : शहराचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. आता त्यांना जिवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सुहास शिरसाठ (वय ३७, रा. बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरसाठ हे आज, बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास बाजार समिती चौक येथे असताना एका अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या मोबाइलवर संदेश आला. यात ‘संग्राम को दो दिन के अन्दर खत्म करुंगा’ अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या मोबाइल क्रमांकधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक फौजदार अमिना शेख करत आहेत.