अहिल्यानगर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी इच्छुकांची चाचपणी केली. यावेळी २०० हून अधिक जणांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. इतर पक्षातील काही इच्छुक संपर्कात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सरकारी विश्रामगृहात इच्छुकांना बोलवण्यात आले होते. तेथे प्रभागनिहाय इच्छुकांचे अर्ज संकलित करण्यात आले. यावेळी पूर्वी राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या १७ जणांचाही सहभाग होता.

 याशिवाय पूर्वी भाजपकडून निवडून आलेले मनेष साठे व काँग्रेसकडून निवडून आलेले बाळासाहेब पवार उपस्थित होते. मात्र, महिला इच्छुकांची उपस्थिती नगण्यच होती. पक्षाचे काही माजी नगरसेवक आपल्या चिरंजीवांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी आलेले होते. सर्वच राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सर्वांत प्रथम इच्छुकांचे अर्ज मागवत बाजी मारली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी सांगितले की, मंगळवारी (दि. ४) मुंबईत पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्यातील आमदार व जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इच्छुकांची माहिती सादर केली जाणार आहे. तसेच शहरातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे. निवडणुकीत उमेदवारी देताना विकासाचा दृष्टिकोन असणारा, समाजासाठी वेळ देणारा, सेवाकार्यासाठी वेळ देणारा आदी निकषांचा विचार केला जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

इतरांचा निर्णय पुढील जुळणीवर

इतर राजकीय पक्षांचे काही माजी नगरसेवक संपर्कात आहेत, त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, पुढील जुळणी कशी होते, हे पाहून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) २०० पेक्षा अधिकांनी उमेदवारीची मागणी केली, यामध्ये प्रभाग ४ मधूनही (मुकुंदनगर) इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मोठ्या संख्येने अर्ज आले असले तरी महायुतीच्या माध्यमातूनच आगामी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.