scorecardresearch

आढळराव-अमोल कोल्हे संघर्ष पेटला; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोल्हेची टीका

खेड घाट बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनावरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात वाद सुरु आहे.

Amol-Kolhe
आढळराव-अमोल कोल्हे संघर्ष पेटला; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोल्हेची टीका (Photo- Amol Kolhe Twitter)
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील वाद शिगेला पोहोचला आहे. रस्ता आपणच मंजूर केल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला. त्यानंतर कोल्हेंनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. हे काम कसं झालं? याबाबत माहिती दिली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

खेड घाट बायबासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करून वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. त्यावर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. “जर चोरांचं राज्य असेल. काही लोकं म्हणतात सगळे चोर एकत्र झाले. दुर्दैवाने या चोराकडे बीएमडब्ल्यू नाही. चोराला सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी शूटींग करावी लागते. तेव्हा त्याच्या घरची चूल पेटते. ज्यांच्याकडे बीएमडब्ल्यू ते चोर की ज्यांना कामधंदा करावा लागतो ते चोर, आता त्यांनी ठरवावं” अशी अप्रत्यक्ष टीकाही अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर केली.

“माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये”, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडलं.

पंतप्रधान मोदी – शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला. कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना खासदारकीसाठी तिकीट जाहीर झाले. अगदी प्रचाराच्या दिवसांपासून अमोल कोल्हे यांनी आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं. शिरुर मतदारसंघातील एकूण १२ लाख ८६ हजार २२६ मतांपैकी अमोल कोल्हे यांना ४९.१७ टक्के मते मिळाली. २३ उमेदवार उभे असणाऱ्या या मतदारसंघातील जवळजवळ ५० टक्के म्हणजेच ६ लाख ३२ हजार ४४२ मते मिळाली. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या अढळराव पाटील यांना ४४.६४ टक्के म्हणजेच ५ लाख ७४ हजार १६४ मते मिळाली. कोल्हे यांनी ५८ हजार २७८ मतांनी अढळराव यांचा पराभव केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp mp amol kolhe on shivajirao adhalrao patil rmt

ताज्या बातम्या