राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला भाजप-सेनेच्या सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे. आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत व्यक्त केला. सरकारने दिलेली दीड लाखाची कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. आम्हाला ही कर्जमाफी नको आहे. तर सरसरकट सातबारा कोरा हवा, त्यासाठी आमचा हा हल्लाबोल असल्याचा घणाघात विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी केला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची ७१ हजार कोटीची कर्जमाफी झाली. परंतु आत्ताचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची ‘तारीख पे तारीख’ देत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकणार नाही. कारण हे सरकारच कर्जबाजारी झाले आहे. खोटया जाहिराती देऊन हे सरकार आपल्या करातून जमा होणाऱ्या पैशावर डल्ला मारताना दिसते आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

ज्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला भरभरुन मतदान केले.त्याच सरकारच्या काळात विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनेहल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. या विदर्भाचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री आहेत. परंतु असे असताना याच विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी नको, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी त्यांनी केली.

जाहीर सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी दांभिकपणाचा आव आणणाऱ्या आणि राजकारण करणाऱ्या खोटारडया सरकारला खाली खेचल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या महिलांचे कुंकू पुसणाऱ्या सरकारला जागं करुन त्यांना थाऱ्यावर आणण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.