काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. परंतु आम्हाला मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून मनसेला या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. कोथरुड त्यापैकीच एक भाग आहे. म्हणून मनसेला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे आपल्या सभेतून काय आवाहन करतात, ते बघू आणि गरज पडली तर एकत्रित सभा घेता येतात का हे पाहिलं जाईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. सध्या वेळ फार कमी आहे. याबाबत लवकरच भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“आगामी विधान निवडणुकी च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक भागात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात येत आहे. या सर्वाना उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिक भाजप सरकार विरोधात पुढे येऊन बोलत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीच्या 175 हून अधिक जागा निवडून येतील,” अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली. तसंच आघाडीतील सर्व नेते मिळून मुख्यमंत्री कोण असेल याबाबत निर्णय घेतली असंही ते म्हणाले.

“केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन पाच वर्षाचा काळ झाला. भाजप सरकारकडून 2014 च्या निवडणुकीत देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या नियोजन शून्य सरकारच्या कारभारामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुणाच्या हाती रोजगार नाही, महिलांच्या सुरेक्षाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय यासह अनेक प्रश्न आज देखील प्रलंबित आहे.” यावर हे सरकार काही बोलताना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, “सध्या राज्यातील अनेक भागात भाजपकडून 370 अनुच्छेद बाबत प्रत्येक ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन केले जात आहे. पण आम्ही देखील 370 अनुच्छेद पाठिंबा दिला आहे. हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे. तसेच 370 हा राष्ट्रीय मुद्दा असल्याने, या निवडणुकीत राज्याचे मुद्दे भाजपकडून मांडणे अपेक्षित आहे. मात्र सध्या तरी असे होताना दिसत नाही,” अशा शब्दात भाजपवर त्यांनी सडकून टीका केली.

आणखी वाचा- सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत, काँग्रेस-राष्ट्रवादी नाही : अजित पवार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “10 रुपयांमध्ये जेवण देणार, शेतकरी वर्गाची कर्जमाफी करणार अशी घोषणा त्यांनी केली. आहो मागील पाच वर्ष सत्तेत असताना, झोपला होता? असा सवाल त्यांनी यावेळी केला. “मी कसा आहे, ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की, कशाचे हे तापासायच काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.