महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. यानंतर महायुतीतले नेते त्यांचं अभिनंदन करत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत. रोहित पवारांनी तर या पाठिंब्याची तुलना थेट तंबाखूच्या पुडीवरच्या इशाऱ्याशी केली आहे. रोहित पवारांची पोस्ट चर्चेत आहे.

राज ठाकरे पाठिंबा देताना काय म्हणाले होते?

मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे होतील असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला, कोल्ह्याला द्राक्षं आंबट”, म्हणत शिवसेना उबाठा नेत्यांची बोचरी टीका

रोहित पवारांची पोस्ट काय?

तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! अशी खोचक पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. आता यावर राज ठाकरे काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंचं ते वक्तव्यही चर्चेत

“येणारी लोकसभेची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. आपण खड्ड्यात जाणार की वरती जाणार आहोत. अनेक निवडणुका येतील. विधानसभेच्याही निवडणुका येतील. पण आज हाणामाऱ्या सुरु आहेत. विधानसभेला तर कोथळे बाहेर येतील. मी मागच्या भाषणात बोललो होतो महाराष्ट्रात चुकीचा फुटला आहे. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. मध्यंतरी मी पुण्याला गेलो होतो. तिथे पाचजण राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी म्हटलं कुणाचे? तिघे म्हणाले आम्ही दादांचे, दोघे म्हणाले आम्ही शरद पवारांचे. अशा सगळ्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्राकडूनही माझी अपेक्षा आहे की त्यांनी व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे त्याला राजमान्यता मिळाली तर भीषण दिवस आहेत.”