राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे अनेकांना आपले भाऊ, मुलगा वाटत आहेत. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख वाटणे त्यांचं यश आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत असं सांगत उद्धव ठाकरे त्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली तसंच इतर जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शरद पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत जाहीर केली. यावेळी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान शरद पवारांना संजय राऊतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे”.

संजय राऊत काय म्हणाले आहेत –

“मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन केलं आहे. ते राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत, मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत. आजच्या दिवशी हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

नेत्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करु नये

शरद पवार यांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करु नये असं आवाहन केलं. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिथे गेलंच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे. पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधानांनाही दौऱ्यावर येऊ नका म्हणून विनंती केली होती

“माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पूनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा. मला आठवतं की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना येऊ नका अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असं त्यांना म्हणालो. तुमच्या इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनीही दौरा रद्द केला”, असं सांगत पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे न करण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on shivsena sanjay raut maharashtra cm uddhav thackeray sgy
First published on: 27-07-2021 at 13:07 IST