आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी यवतमाळधील पुसद येथील जाहीर सभेत दिले. हे शेतकऱ्यांचे सरकार नाही तर मुठभर लोकांचे सरकार आहे अशी टीका यावेळी अजित पवार यांनी केली. सत्तेत असून शिवसेना मोर्चा काढते. लोकांना दुधखुळे समजता का? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला.

“कुठल्या दिशेने राज्य चाललं आहे. वसंतराव नाईक, सुधाकर नाईक, शरद पवार यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी राज्य कंगाल करुन टाकले आहे. या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचे सातबारा कोरा केला ते जाहीर करावे”, असं जाहीर आव्हान अजित पवार यांनी यावेळी केलं.

“मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत. मात्र वाचाळवीर काहीही बोलत आहेत. राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. पी चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. करा चौकशी परंतू ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे हे योग्य नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पूरग्रस्त परिस्थितीला देवेंद्र फडणवीस व येडियुरप्पा यांचे सरकार जबाबदार आहे”, असा आरोप यावेळी अजित पवार यांनी केला. “या राज्याला मजबुत, कणखर, शब्द पाळणारं, अठरापगड जातीतील लोकांना काम देणारं, गोरगरीबांचे, रयतेचे राज्य आणूया”, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांची कधीच कुणी थट्टा केली नाही एवढी क्रुर थट्टा या भाजपा सरकारने केली आहे असा थेट आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. “सत्ताधाऱ्यांची जनतेशी काय बांधिलकी आहे हे पुरग्रस्त भागातील जनतेला केलेल्या कामावरून लक्षात येत आहे”, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.