सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळेंच्या नावाची सुरू होती चर्चा

संग्रहित (PTI)

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. “सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे,” असं शरद पवार म्हणाले होते. दैनिक लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केलं.

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांचा संच मोठा आहे. या सर्वांतून मान्य असतील अशा अनेक लोकांची नावं घेता येतील. अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी अनेक नावं देता येतील जी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत,” असंही ते नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

आणखी वाचा- चंद्रकांत पाटील म्हणतात, “सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही…”

काय म्हणाले होते शेलार?

पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही,” असं शेलार यावेळी म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp supremo sharad pawar clarifies on supriya sule chief minister of maharashtra and who will be the next leader interview jud