राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून भाजपाच्या आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

नक्की वाचा >> संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया नेमकं काय म्हणालेल्या?
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.

राऊत काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपदासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात,” असं म्हटलं. “सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हटलं आहेत.

नक्की वाचा >> “राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”

भाजपाचा टोला
सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ असणाऱ्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरुन निशाणा साधलाय. “उद्धव ठाकरे २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार…राऊत; अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर तुळजा भवानीचा नवस फेडणार… सुळे बहुदा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार…”, असा टोला भातखळकर यांनी लागवलाय.

महिला मुख्यमंत्र्यांवरुनही सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तरही सुप्रिया यांनी दिलं. “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule vs shivsena sanjay raut on cm post bjp atul bhatkhalkar comment scsg
First published on: 31-05-2022 at 14:59 IST