जिल्ह्य़ात दुष्काळामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहिल्या पावसावर लागवड केलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. जिल्ह्यात ६ लाख ३९ हजार ६१८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाले. त्यामुळे ६ लाख ५६ हजार ८४५ शेतकऱ्यांना फटका बसला. बाधित क्षेत्राच्या भरपाईसाठी ४८७ कोटी ३६ लाख रुपये निधी लागणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात या वर्षी दुष्काळाची भीषण स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. अडीच महिने उलटूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त झाले. कापूस, सोयाबीन पिकांची वाढ होणे आता शक्य नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. प्रशासनानेही बाधित क्षेत्राची माहिती एकत्रित करण्यास सुरुवात केली. राज्य सरकारने बाधित क्षेत्राची माहिती व त्याच्या भरपाईस लागणाऱ्या निधीची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यासंदर्भात सूचना केल्या. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ तालुक्यांतील बाधित क्षेत्राची माहिती एकत्रित करण्यात आली. यात दोन हेक्टरच्या आतील आणि दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांचे वर्गीकरण करण्यात आले. धारूर तालुक्यात ४१ हजार २६२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. केज ८२ हजार ८७८, अंबाजोगाई ६० हजार ४८२, परळी ५४ हजार १०५, बीड ८२ हजार ६१९, आष्टी १ लाख १६ हजार ५५५, पाटोदा ४१ हजार २३०, शिरुर ४९ हजार ७३१, माजलगाव ५६ हजार ९१४, गेवराई ७० हजार ९८९ याप्रमाणे बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची संख्या आहे. या बाधित क्षेत्राच्या नुकसानभरपाईसाठी ४८७ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need 500 cr fund for affected area
First published on: 22-08-2015 at 01:40 IST