लातूर येथे शिवराज पाटील चाकूरकरांच्या सत्कारात पुन्हा एकदा त्यांच्या कपडय़ाची चर्चा त्यांनीच घडवून आणली. १९६७ साली काँग्रेसच्या प्रचारात विविध सभांमध्ये टाय लावून भाषण करणाऱ्यांमध्ये चाकूरकर होते. वकील म्हणून तो पेहराव होता. तेव्हापासून माझ्या कपडय़ांवर जी टीका होत होती, ती अजूनही सुरूच आहे. आता एकाला दिलेला टोला दुसऱ्याला लागतो आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपडय़ांवरून सुरू असणारी चर्चा गैरलागू असल्याचे त्यांनी म्हटले होते. कपडय़ांवरील या चर्चेत फारसे न गुंतता पतंगराव कदम यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाची काँग्रेस पक्षाला देशात आणि राज्यात गरज असल्याचे सांगितले. टाऊन हॉल मैदानावर शनिवारी शिवराज पाटील चाकूरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर होते.
सत्कारानंतर चाकूरकर म्हणाले, पंडित नेहरूंनी समाजवादी समाजरचनेची कल्पना स्वीकारली. मध्यममार्गी राजकारण करण्याचे ठरवले. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत लोकशाही तत्त्वावरच मार्गक्रमण केले. यशवंतराव चव्हाणांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला. इंद्रजित गुप्ता, अटलबिहारी वाजपेयी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी या सर्वानी संतुलित विचाराचेच राजकारण केले. हीच देशहिताची दिशा असल्याचे ते म्हणाले. आपल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत ज्यांनी ज्यांनी प्रारंभापासून साथ दिली त्या सर्वाचा नामोल्लेख करत त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. या कार्यक्रमात काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे भाषण लक्षवेधक ठरले. ते म्हणाले, देशात व राज्यात काँग्रेसची सध्याची स्थिती दिशाहीन आहे. काय चालले आहे कोणालाच काही कळत नाही. लोकांची द्यायची तयारी आहे, मात्र घ्यायलाच कोणी नाही. नव्याने अशोकराव चव्हाणांकडे नेतृत्व आले आहे. बघूया काय होते ते? त्यांनी चुका केल्या तर त्यांनाही आपण सोडणार नाही. सध्या काँग्रेसला या वेळी देश व राज्यपातळीवर चाकूरकरांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
 व्यासपीठावरील मान्यवरांनी चाकूरकरांचा संयमीपणा, अभ्यासूवृत्ती, निष्कलंक चारित्र्य, सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे काम, ऋजुता आदी गुणांचे कौतुक केले. देशाला व राज्याला चाकूरकरांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे अनेकांनी सांगितले.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, रजनीताई पाटील, अमर राजूरकर, दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, अमित देशमुख, नाना भिसे, जयंतराव पाटील, जनार्दन वाघमारे, पद्मसिंह पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण, खासदार सुनील गायकवाड, डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. अशोकराव कुकडे, अॅड. मनोहरराव गोमारे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आमदार बसवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुमारे २० वक्त्यांची भाषणे झाली.
 लातूर-नांदेड जवळीक
कार्यक्रमापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी बाभळगाव येथे जाऊन वैशालीताई देशमुख व अमित देशमुख यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच जाहीर कार्यक्रम लातुरात होत आहे याचा उल्लेख करत लातूर व नांदेड यांचे नाते कसे सलोख्याचे आहे, हे आवर्जून स्पष्ट केले.