scorecardresearch

“हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी!
संग्रहित फोटो

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री न नेमल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारा यांचंही कौतुक केलं आहे. ते बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

अजित पवारांच्या कामाचं कौतुक करताना धनंजय मुंडे म्हणाले की, अजित पवारांचं पहिल्यापासून मराठवाड्यावर खूप प्रेम आहे. अजित पवारांनी जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. बीड जिल्ह्यात शेतीचं उत्पन्न वाढवणारा निर्णयही अजित पवारांनी घेतला. कोविडच्या काळात कुणी-कुणाला घरात घेत नव्हतं. मुंबईमध्ये आपला सख्खा भाऊ काम करत असला, तर त्याला परत गावात सुद्धाघेतलं जात नव्हतं. तो एवढा वाईट काळ होता. कोविडनं माणसं मारायच्या आधी माणसांमधील माणुसकी मारली, सख्या भावाला, नातेवाईकांना घरात येऊ दिलं नाही.

हेही वाचा- “ते दोघंच कित्येक दिवस मंत्रिमंडळात होते, तेव्हा…”, अजित पवारांचा वेदान्त प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांना सवाल!

पुढे ते म्हणाले की, करोनाच्या कठीण काळात सामान्य माणूस माणुसकी विसरला होता. पण राजकारणी म्हणून अजित पवारांनी माणुसकी कशी जिवंत ठेवली, आपण सर्वांनी पाहिलं आहे. ते सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयात उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राकडे लक्ष देत होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. करोना काळात माणुसकी जिवंत ठेवायचं काम अजित पवारांनी केलं.

हेही वाचा- “वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? १०% हिशोब की…”; आशिष शेलारांचा सवाल

आजचा प्रसंग वेगळा आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. हे सरकार सत्तेवर कसं आलंय? हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून बेशिस्तपणे वागत आहेत. ते केवळ विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांना घाबरतात. समोरचे कितीही मातबर राजकारणी असू द्या, सरकार बेशिस्तीत वागायला लागतं, तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात, अशी फटकेबाजी धनंयज मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान त्यांनी पालकमंत्री न नेमण्यावरून जोरदार टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New government only scared of ajit pawar dhananjay munde statement in beed ncp program rmm