सोलापुरातील डॉ. सय्यद यांचा पुढाकार
सोलापूर : हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमजद सय्यद यांनी हृदयरुग्णांसाठी नुकतेच सहा मजली रुग्णालय उभारले. परंतु करोनाचा वाढणारा प्रचंड प्रादुर्भाव पाहता थाटात उद्घाटनाची औपचारिकता बाजूला ठेवून करोना रुग्णांसाठी आपले नवे रुग्णालय सोलापूर महापालिकेला करोना रुग्णांवरील उपचारासाठी सुपूर्द केले.
डॉ. अमजद बशीरअहमद सय्यद हे मूळचे सोलापूरचे मध्यमवर्गीय कु टुंबातील असून डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेऊ न हृदयरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. पद्मशाली चौकात त्यांनी स्वत:चे नोबल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर या नावाने सहा मजली हॉस्पिटल उभारले. याकामी त्यांच्या पत्नी तथा लॅपरोस्कोपी व प्रसूतितज्ज्ञ डॉ.फिरदोस सय्यद यांची मोलाची साथ लाभली. दरम्यान, नवे अद्ययावत रुग्णालय उभारल्यानंतर थाटात शुभारंभ करण्याची तयारी डॉ. सय्यद दाम्पत्याने सुरू केली. परंतु त्याचवेळी दुसरम्य़ा लाटेत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत गेला आणि शुभारंभाची औपचारिकता बाजूला ठेवून करोना रुग्णांवर उपचाराला प्राधान्य देत डॉ. अमजद सय्यद यांनी हे अद्ययावत २५ खाटांचे नवे रुग्णालय कोविड उपचार केंद्रासाठी महापालिका प्रशासनाला दिले.
यासंदर्भात बोलताना डॉ. अमजद सय्यद यांनी, करोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे,की रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटाही मिळणे कठीण होत आहे. अशा राष्ट्रीय आपत्तीप्रसंगी राष्ट्रभावनेने करोनाशी लढणे आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य आहे. म्हणूनच आपण करोना रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी शुभारंभाची औपचारिकता बाजूला ठेवून मी माझे नवे रुग्णालय करोना रुग्णांसाठी देऊ शकलो, याचे समाधान आहे, यामागे आई-वडिलांची शिकवण महत्त्वाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.