रत्नागिरी तालुक्यातील पाली, मोहितेवाडी येथे एका वन वधूने लग्न झाल्यावर काही दिवसात आपल्या सासरच्या लोकांना लुटण्याचे काम केल्याने खळबळ उडाली आहे. या वधूने घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना घडल्यावर सासरच्या लोकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी या वन वधूवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ताराम राजाराम मोहिते (वय ५९ वर्षे) व्यवसाय शेती, रा. मोहितेवाडी पाली, ता.जि. रत्नागिरी यांच्या राहत्या घरी घडली. फिर्यादींच्या मुलाशी लग्न झालेली त्यांची सून, हिने २८ जून २०२५ रोजी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास तिने फिर्यादींच्या बेडरूममधील लोखंडी कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीचे कुलूप काढून, त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपये रोख रक्कम असे एकूण ३ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज घेवून पलायन केले.
या घटनेची तक्रार दत्ताराम राजाराम मोहिते यांनी १० जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. १३७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२) प्रमाणे एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.