देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० संस्थांची स्थापना केली असून, यंत्रमागावरील उत्पादित कापडाच्या निर्यातीला चालना देण्याची जबाबदारी पिडीक्सेलवर सोपविली आहे. येत्या पाच वर्षांत देशात ५ लाख शटललेस लूम स्थापित करण्याचे आणि सध्या साडेचार टक्के यंत्रमाग कापड निर्यातीचा कोटा दहा टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पिडीक्सेलचे माजी अध्यक्ष भरतकुमार झाजेड यांनी शुक्रवारी दिली.     
वस्त्रनगरी इचलकरंजी येथे शुक्रवारपासून तीन दिवस भरणा-या आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाला प्रारंभ झाला. या प्रदर्शनाचे आयोजन पिडीक्सेल (पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल),केंद्र शासनाचा वस्त्रोद्योग विभाग यांनी केले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पिडीक्सेलचे माजी अध्यक्ष झाजेड संयोजक या नात्याने बोलत होते. ते म्हणाले, इचलकरंजीसारख्या यंत्रमाग क्षेत्रामध्ये हजारो प्रकारच्या कापडांचे नमुने उत्पादित होत आहेत. कापड उत्पादित करणारे उद्योजक, व्यापारी यांना या प्रदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.     
पिडीक्सेलचे अध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी वस्त्रनगरीच्या उंचावणा-या आलेखाचा आढावा घेतला. ते म्हणाले, प्रदर्शनामध्ये असलेल्या १२० स्टॉलपैकी ७० स्टॉल स्थानिक उद्योजकांचे आहेत. इचलकरंजीसारख्या विकेंद्रित क्षेत्रामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्त्रप्रदर्शन होत असल्याने वस्त्रनगरीची ओळख जागतिक बाजारपेठेत पोहोचली आहे. पिडीक्सेलचे संचालक गजानन होगाडे यांनी आभार मानले.
२२ देशांतील ६० प्रतिनिधींची उपस्थिती
या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अमेरिका, व्हिएतनाम, तुर्कस्तान, कंबोडिया, केनिया, झिम्बाब्वे, टांझानिया, बांगलादेश आदी २२ देशांतील ६० प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्यामध्ये यंत्रमाग उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, दलाल, शासकीय प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. यापैकी अनेकांनी इचलकरंजीतील उत्पादित कापडाबद्दल समाधान व्यक्त करून खरेदीबाबत सकारात्मक भूमिका घेतली.