विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं आणि नागपूरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून चालू असलेला राजकी आखाडा शांत झाला. मात्र, अधिवेशनामध्ये दोन्ही बाजूच्या आमदार मंडळींनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे आणि दाव्यांचे पडसाद पुढचे काही दिवस राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तर म्हणून केलेल्या भाषणातील एका दाव्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दाव्यावर आज सकाळी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करून अजित पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

नेमकं काय घडलं?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेला एक दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली”, असं अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा – “आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर…”, शिंदे गटाचा अजित पवारांना इशारा; शंभूराज देसाई म्हणतात…

अजित पवारांच्या या दाव्याचे आता पडसाद उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचा हा दावा खोडून काढला आहे. “मोगलांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस त्यांचे हाल केले. पण संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं. पण त्यांनी धर्म सोडला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक का म्हणायचं नाही?” असा सवाल शंभूराज देसाईंनी उपस्थित केला आहे.

त्यापाठोपाठ “अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा – संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्याने संतापलेल्या अजित पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांच्या विचारांच्या लोकांनी…”

या सर्व वादावर आता भाजपा नेते निलेश राणेंनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी अजित पवारांच्याच काही जुन्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या ट्वीट्समध्ये अजित पवारांनीच छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’असा केल्याचं दिसत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये “धर्मवीर-धुरंदर राजकारणी, ज्यानं दुश्मनांचा उतरविला माज, ऐसे पराक्रमी अपुले राजे छत्रपती संभाजी महाराज, त्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा”, असं ट्वीट अजित पवारांनी केल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.