माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करण्याचं सत्र सुरु ठेवलं असून संजय राऊत कुस्क्या म्हाताऱ्यासारखे असल्याचं म्हटलं आहे. सत्तास्थापनेचा पेच सुरु झाल्यापासूनच निलेश राणे संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. नेहमीप्रमाणे यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत संज्या राऊत म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मीटिंग करायची यांनी. एनडीएची मीटिंग शिवसेनेने नाकारली, पण संज्या राऊत गल्लीतल्या त्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा आहे जो सगळं ठीक असेल तरी सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालतो”.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळीदेखील पत्रकार परिषद घेत शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. तसंच भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असल्याचा घणाघात केला.

सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, असं म्हणत राऊत यांनी माध्यमांवरही टीका केली. “२०१४ मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपाने त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane on shivsena sanjay raut bjp ncp congress maharashtra political crisis president rule sgy
First published on: 19-11-2019 at 11:47 IST