सक्तवसुली संचालनालयाचा ताबा ४८ तासांसाठी आमच्या हातात दिला तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील अशी खोचक शब्दांमध्ये राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या पराभवासंदर्भात भाष्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव असणाऱ्या निलेश राणे यांनी ट्विटरवरुन भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राऊत यांच्या या वक्तव्याला ‘भीक मागणे’ असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Rajya Sabha Results: “सहाव्या जागेच्या निमित्ताने कुणी शहाणे सरकार अस्थिर होण्याची स्वप्ने पाहत असतील तर ते…”; शिवसेनेचा टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांच्या दबावाचा वापर करुन भाजपाने राज्यसभेमध्ये विजय मिळवल्याकडे इशारा केला. “४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील” असा टोला राऊत यांनी लगावला. राऊत यांच्या याच वक्तव्यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून मनसेनं यावरुन शिवसेनेला टोला लागवल्यानंतर भाजपा नेते निलेश राणेंनीही या वक्तव्यावरुन राऊत यांचा एकेरी उल्लेख करत टीका केलीय.

निलेश राणेंनी ट्विटरवरुन ईडीचा ताबा जणू काही दोन हजार रुपये उधार मागितल्याप्रमाणे मागितला जातोय असं म्हटलंय. “संजय राऊत दोन दिवसांसाठी ईडी मागतायत, जसं काही दोन हजार उधार मागतायत. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे. हे सगळं कमवावं लागतं,” असं ट्विट निलेश राणेंनी रविवारी दुपारी संजय राऊत यांनी ईडीसंदर्भातील विधान केल्याच्या काही तासांनंतर केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. पुरेसे संख्याबळ असूनही पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाला अपक्षांची मते फोडण्यात यश आले असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.