scorecardresearch

“मंत्री आदित्य ठाकरेंना माझा सवाल आहे, की हा छापा…”, नितेश राणेंचं खोचक प्रत्युत्तर!

नितेश राणे म्हणतात, “संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?”

nitesh rane targets aaditya thackeray
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईत प्राप्तीकर विभागानं राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावर केलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. “हे छापे म्हणजे महाराष्ट्रावर आक्रमणच आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिलेली असताना आता त्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांनाच उलट सवाल केला आहे. तसेच, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणात देखील राहुल कनालचा संबंध असण्याची शक्यता त्यांनी सूचित केली आहे.

“संध्याकाळी सातनंतर राहुल कनाल…”

नितेश राणेंना राहुल कनाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल कनाल यांचा कॅफे बँड्रा नावाचा एक रेस्टॉरंट चालतो. तिथे सगळं स्ट्रक्चर अनियमित आहे. करोनाच्या काळात कोविड संदर्भात ज्या निविदा निघाल्या, त्यातही कनाल यांचा कुठेतरी हस्तक्षेप आहे असा अनेकांना संशय आहे. मुंबईतल्या नाईट लाईफ गँगचा राहुल कनाल सदस्य आहे. राहुल कनाल कुणाचे निकटवर्तीय आहेत? संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत? त्यांच्यावर एवढी कृपादृष्टी का की त्यांना थेट शिर्डीच्या संस्थानावर ट्रस्टी म्हणून पाठवलं गेलं? राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत राहुल कनालचं देखील नाव होतं असं आम्हाला समजलं. नेमका या राहुल कनालकडे एवढा पैसा आला कुठून?”, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे. “ऊठसूठ चोऱ्या करायच्या, लोकांची लुटमार करायची, कोविडच्या नावाखाली टेंडरमधून पैसे खायचे, रात्री सातनंतर नाईट लाईफ गँग चालवायची आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही, केंद्रीय यंत्रणा वगैरे… यात भाजपाचा काय संबंध? माझा मंत्री आदित्य ठाकरेंना हाच प्रश्न आहे की हा छापा राहुल कनाल यांच्यावरच का पडला? काय आहे राहुल कनालकडे? कुणाचा पैसा आहे त्यांच्याकडे? महाराष्ट्र तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. कारण तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालेला आहात”, असं नितेश राणे म्हणाले.

“आदित्य ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आहेत असं कुठे म्हटलंय? ते म्हणजे पेंग्विन गँग, नाईट लाईफ गँग हे समजू शकतो. महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते”, अशा शब्दांत नितेश राणेंनी खोचक टोला देखील लगावला आहे.

“जेव्हापासून भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली…”, आदित्य ठाकरेंचा निशाणा, केंद्रावर गंभीर आरोप!

“दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्याबाबतीत ज्या घटना झाल्या, त्यात राहुल कनाल यांचा तर हात नव्हता ना? त्यांचं लोकेशन, सीडीआर रिपोर्ट यावर तपास केला, तर त्यात काही ना काहीतरी सापडेल. नेमके ८ आणि १३ तारखेला रात्री हे कुठे आणि कुणाबरोबर होते याचा थोडा तपास करायला हवा”, अशं देखील नितेश राणे म्हणाले.

काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरेंनी छापेमारीवर प्रतिक्रिया देताना भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटू लागल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असं समजलं आणि महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitesh rane slams aaditya thackeray on it raid in rahul kanal sanjay kadam pmw

ताज्या बातम्या