रझा अकदामीच्या इफ्तार पार्टील काल मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हजेरी लावली होती. यावरून आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ज्या ‘रझा अकादमीने’आझाद मैदानात अमर जवान स्तंभ तोडला व महिला पोलीस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन, त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहीत करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवर व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, “काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. ही रझा अकादमी नेमकी काय आहे? तर, जिने आझाद मैदानावरील अमर जवान स्तंभाची मोडतोड केली आणि त्यानंतर महिला पोलिसांना मारहाण आणि अत्याचार केले. ही रझा अकादमी म्हणजे तीच जिने सतत देशविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत.”

तसेच, “हीच ती रझा अकादमी आहे जिने भिवंडीत काढलेल्या मोर्चात दोन पोलीस अधिकारी मारले गेले. हीच ती रझा अकादमी जिने अशाताच झालेल्या नांदेड, अमरावती, मालेगावमध्ये दंगल घडवण्यात पुढाकार घेतला आणि त्या दंगलीत, मोर्चांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांवर अत्याचार केले.” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “एकाबाजुला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला सभागृहात सांगतात की, रझा अकादमीवर बंदी घालण्याचा आम्ही विचार करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच पोलीस अधिकारी जर यांच्याबरोबर इफ्तार पार्टी करत असतील, तर महाविकासआघाडीचा अधिकाऱ्यांना दिलेला हा सरकारी आदेश तर नाही ना? हा प्रश्न मला या निमित्त विचारायचा आहे.” अशा शब्दांमध्ये आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.