शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय” अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. “इथून पुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात, तर तुम्हाला सोडणार नाही, याला धमकी समजा”, अशा शब्दांत बावकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान, बावनकुळे यांच्या धमकीला (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. देशमुख म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हा मतिमंद माणूस आहे. बावनकुळे याची काय लायकी आहे? उद्धव ठाकरे साहेबांना घराच्या बाहेर निघू न देण्याची भाषा करतोय. तुम्ही जर खरं दूध प्यायला असाल तर उद्धव साहेबांना घराबाहेर निघण्यापासून रोखून दाखवा.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांचं बोलणं अशा पद्धतीचंच राहिलं तर, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे जातील तिथे भाजपा रस्त्यावर उतरेल. यापुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल एकही अपशब्द बोललात तर राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. ही धमकी आहे, असं समजा.
दरम्यान, बावनकुळे यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर आता शिवसेनेकडून बावनकुळेंना प्रत्युत्तर आलं आहे. अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळे यांना मतिमंद म्हटलं आहे.
हे ही वाचा >> बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर, तृप्ती देसाई लोकसभा निवडणूक लढणार, म्हणाल्या, “भाजपाने…”
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.