scorecardresearch

“तू चुकीच्या पक्षात आहेस, काँग्रेसमध्ये ये”, मित्राच्या ऑफरनंतर नितीन गडकरी म्हणाले होते…

नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये उद्योजकांच्या एका संमेलनात मित्राने काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिल्याचा किस्सा सांगितला.

BJP-Nitin-Gadkari (1)
नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाच्या संसदीय मंडळास स्थान न मिळाल्यानंतर त्यांच्या नाराजीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये उद्योजकांच्या एका संमेलनात मित्राने काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिल्याचा किस्सा सांगितला. तसेच या मित्राला मी एकवेळ विहिरीत उडी मारून जीव देईन, मात्र काँग्रेसमध्ये येणार नाही, असं सांगितल्याचं गडकरींनी नमूद केलं.

नितीन गडकरी म्हणाले, “मी नागपूरमध्ये विद्यार्थी नेता होतो. डॉ. श्रीकांत झिजकार माझे मित्र होते. ते खूप हुशार होते. एकदा त्यांनी मला म्हटलं, नितीन तू खूप चांगला व्यक्ती आहेस. तुला खूप चांगलं राजकीय भविष्य आहे. मात्र, तू चुकीच्या पक्षात आहेस. तू काँग्रेसमध्ये ये.”

“मित्राच्या काँग्रेस प्रवेशाच्या ऑफरवर मी तेव्हा त्याला सांगितलं की श्रीकांत मी विहिरीत उडी मारून जीव देईन, मात्र काँग्रेसमध्ये येणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.

“आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय”

दरम्यान, या देशात नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं, तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केली होती. “आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय” असं म्हणत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

हेही वाचा : “गरज संपल्यानंतर कोणालाही फेकून देऊ नका” नितीन गडकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, बुलडाण्यातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विविध समस्यांबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंवर कर नव्हता, पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठला नव्हता, असे पाटील यावेळी म्हणाले होते. एकेकाळी ४०० रुपयांना मिळणारं सिलेंडर १२०० रुपयांपर्यंत महाग होईल, असं कधीही वाटलं नसल्याचं पाटील म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-08-2022 at 13:10 IST

संबंधित बातम्या