नोटाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा करण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. नोदाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा सध्या सुरु आहे. मात्र राज्यासह देशात कुठेही मंदी किंवा महागाई नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
‘नोटाबंदीमुळे महागाई वाढल्याचा आणि बाजारात मंदी आल्याचा कांगावा करण्यात येत आहे. मात्र देशात कुठेही अशी परिस्थिती नाही.

सर्वसामान्य माणूस आनंदात आहे,’ असे पाटील यांनी म्हटले. नोटाबंदीच्या निर्णयाचे कोणतेही प्रतिकूल परिणाम झालेले नाहीत, असेही ते म्हणाले. ‘लोक मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारांकडे वळले आहेत. त्यामुळे नोटाबंदीचे प्रतिकूल परिणाम दिसून येत नाहीत. लोकांनी आता कॅशलेस व्यवहारांची सवय करुन घेतली आहे. लोकांनी स्वत:ला बदलासोबत जुळवून घेतले आहे,’ असेही त्यांनी म्हटले.

नोटाबंदीमुळे गरिबांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र श्रीमंतांना काहीही फरक पडला नाही, अशी टीका विरोधकांकडून मोदी सरकारवर केली जाते. या टीकेचाही चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. ‘वर्षानुवर्षे गरिबांचे शोषण करुन ज्यांनी नोटा जमा केल्या. त्या नोटांनी गाद्या भरल्या. त्यांना नोटाबंदीमुळे सर्व नोटा बँकेत जमा कराव्या लागल्या,’ असेही ते म्हणाले.

मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली होती. यामुळे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यामुळे देशात मोठा चलनकल्लोळ निर्माण झाला. या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लोकांना बँकांसमोरील रांगेत उभे रहावे लागले होते. त्यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज काळा दिवस पाळला.