संग्रहालयातील वस्तूंचे जतन व्हावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या कार्यकाळात भारतातील एकमेव अशी प्रयोगशाळा नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात स्थापन केली. ब्रिटिश गेले आणि संग्रहालयाला अवकळा आली. कालांतराने ती प्रयोगशाळाही बंद पडली. आज इतर राज्ये त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या आणि दुर्मीळ वस्तूंच्या जतनासाठी प्रयोगशाळासंपन्न असताना महाराष्ट्र मात्र प्रयोगशाळेविना आहे.
दोन वर्षां पासून ही प्रयोगशाळाच येथून हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. संवर्धनासाठी वस्तू हलवणे शक्य आहे, पण एकदा स्थापन झालेली प्रयोगशाळा हलविण्याचे शासनाचे धोरण मात्र अचंबित करणारे आहे. दुर्मीळ वस्तूंच्या सुरक्षित पॅकेजिंगपासून वाहतूक करणारी चमू या संस्थेकडे आहे. तरीही सांगली, साताऱ्याच्या संग्रहालयातील दुर्मीळ वस्तूंच्या जतनाकरिता ही प्रयोगशाळाच तिकडे हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
हा ऐतिहासिक अनमोल ठेवा भारतात आहे. महाराष्ट्रही त्यापासून वंचित नाही. ब्रिटिशांच्या कार्यकाळात सी.पी.अँड बेरार प्रांताची राजधानी असलेल्या नागपुरात त्यांनी संग्रहालय स्थापन केले. यात दुर्मिळ आणि अनमोल वस्तूंचा ठेवा त्यांनी ठिकठिकाणाहून गोळा केला. एवढेच नव्हे, तर त्याच्या जतनासाठी प्रयोगशाळाही स्थापन केली. भारतातील ती एकमेव प्रयोगशाळा होती. पुरेसे कर्मचारी तेथे होते. ब्रिटिश राज्यकर्ते ज्या काही चांगल्या गोष्टी  करून गेले त्या स्वतंत्र भारतातील राज्यकर्त्यांना सांभाळता आल्या नाहीत. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील ही प्रयोगशाळा काही दिवस सुरू राहिली आणि कालांतराने ती बंदच पडली. त्याचदरम्यान ऐतिहासिक वास्तू आणि दुर्मीळ वस्तूंचा ठेवा सांभाळण्यासाठी इतर राज्यांनी मात्र प्रयोगशाळा सुरू केल्या. महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातही प्रयोगशाळा आहे.
संवर्धन प्रक्रियेत महाराष्ट्र मागासला असताना लखनौ येथील एनआरएलसी या संस्थेने सकारात्मक पाऊल उचलले. नागपुरातील या ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील दुर्मीळ ठेवा जतन करण्याची जबाबदारी या संस्थेकडे दोन वषार्ंपूर्वी सोपवण्यात आली. त्यावेळी संवर्धन क्षमतेचा विकास करण्यासाठी मृत पावलेली ही प्रयोगशाळा त्यांनी पुन्हा सुरू केली. प्रयोगशाळेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य येथे आहे. संग्रहालयातील वास्तू जतनाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्णही झाले आहे.
महाराष्ट्राकडून प्रस्तावच नाही
एलआरएलसी ही राष्ट्रीय संवर्धन संस्था असून, भारतात कोणत्याही ठिकाणी या संस्थेच्या वतीने अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी करता येते. त्यासाठी केवळ राज्याकडून तसा प्रस्ताव जावा लागतो. हा प्रस्तावच अजून महाराष्ट्राकडून गेलेला नाही. राज्य सरकारने नागपुरात कायमस्वरूपी प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रस्ताव पाठवणे अपेक्षित आहे.
राखी चव्हाण, नागपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No museum in maharastra to save historical monuments
First published on: 07-01-2015 at 03:28 IST