राज्यात सध्या अनेक संकटांची मालिकाच सुरू असल्याचे दिसत आहे, करोनाचे संकट ओढावलेले असताना आता अतिवृष्टीने राज्यभर थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, महापूर, अपघात आदी घटनांमुळे सर्वसामान्य जनतेत चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संकटांना सामोरं जाण्यासाठी राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणांच प्रयत्न सुरू आहेत. तर, अनेक दुर्घटनांमध्ये कित्येकांना जीव देखील गमावावा लागल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज एक आवाहन करण्यात आलं आहे. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असतो, मात्र माझा वाढदिवस साजरा करू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये.”, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

तसेच, “वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये, तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू.” असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

“राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, म्हणून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

“पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one should celebrate my birthday chief minister uddhav thackeray msr
First published on: 25-07-2021 at 18:19 IST