मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात ही लढत होणार होती. त्यात आता भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून ही घोषणा केली आहे. यानंतर भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले, असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुरजी पटेल यांनी म्हटलं की, “मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी दबावामुळे अर्ज मागे घेतला नाही. कोणाचाही माझ्यावर दबाव नव्हता. तसेच, अपक्ष देखील लढणार नाही. पुढील काळात अंधेरीच्या जनतेची सेवा करत राहीन.”
हेही वाचा – अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा
“केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. मी तातडीने पक्षाचा आदेश मानला आहे. आम्ही पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आमच्यासाठी भाजपा आमची आई आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत निराश नाही. तसेच, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही,” असेही मुरजी पटेल यांनी स्पष्ट केलं.