पुणतांब्यातील (ता. राहाता, नगर) शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी ‘शेतकऱ्यांचा संप’ अशी अभूतपूर्व संकल्पना मांडून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. मात्र, तत्पूर्वीच आंदोलकांमध्ये फाटाफूट झाली. बरेचसे प्रश्न ‘जैसे थे’ राहिले. आता पुन्हा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. “शेती व शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्न केंद्र सरकारच्या धोरणाशी निगडीत असल्याने, पुणतांब्याच्या आंदोलनातून फारसे काही निष्पन्न होणार नाही.” असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीवेळी शेट्टी यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पुणतांबा आंदोलन स्थगित करण्यात आले. यातून फार काही हाती येईल अशी स्थिती नाही. कारण मुळात शेतीमालाला योग्य दर मिळाले पाहिजेत. शेतीमालाचे दर ठरविण्यास केंद्राचे धोरण महत्त्वाचे ठरते. राज्य सरकारचा फारसा संबंध येत नाही.”

तसेच, “दुर्दैवाने आज संपूर्ण देशामध्ये झुंडशाही चालली आहे. गलिच्छ राजकारण सध्या देशामध्ये चालू आहे. हे पाहून आज आमच्या मनाला वेदना होतात. कुणीही कुठल्याही जातीचा असो त्याला या देशांमध्ये मोकळेपणाने राहता आला पाहिजे, मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे . मग काश्मीरमधला पंडित असो किंवा अगदी महाराष्ट्रातला अल्पसंख्यांक असो त्याला मोकळेपणाने राहता आला पाहिजे, संविधानाने तसा अधिकारच दिला आहे.” असं यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

“स्वभिमानी शेतकरी संघटनेने आता सगळ्याच पक्षापासून चार हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि जनमत पुन्हा मिळवू.” असा निर्धार शेट्टीनी व्यक्त केला.

याचबरोबर, “आता आघाडी असो किंवा युती या सगळ्यांपासून आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे .केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला आहे. रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडल्या. डिझेल प्रचंड वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे.” असं देखील यावेळी राजू म्हणाले.