ना कसला गाजावाजा ना कसला भपका, थेट मतदारांना साद घालत खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. वाडय़ावस्त्यांवर वसलेल्या हातकणंगले मतदारसंघात शेट्टींच्या प्रचारासाठी ना बडय़ा नेत्यांच्या सभांची गरज भासली, ना जोरदार शक्तिप्रदर्शन करणाऱ्या रॅलींची. त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस राहिला. त्यातही शेतकरी अधिक. कारण हाच बळीराजा शेट्टींचा स्टार प्रचारक बनला आहे.     
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात साखर कारखानदारांचे नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला, पण सहज वाटणारी लढत शेट्टींसाठी कडवी ठरली. एकीकडे सहकार सम्राटांची अवाढव्य यंत्रणा आणि दुसरीकडे शेट्टींसाठी पदरमोड करणारी शेतकऱ्यांची पलटण. अशा विषम परिस्थितीत शेट्टी यांना आव्हानाला सामोरे जावे लागले आहे. शरद पवारांपासून साऱ्या साखर कारखानदारांची शक्ती एकवटली असतानाही शेट्टी यांनी एकाकी झुंज सुरू ठेवली आहे ती केवळ सामान्य मतदारांच्या आश्वासक प्रतिसादामुळे.    
ऊसदर आंदोलनामुळे शेट्टी हे नाव घरादारापासून शिवारात पोहोचले आहे. त्यामुळे प्रचारासाठी शेट्टी गावात आले हे समजल्यावर लोकांना नाव परिचित असल्याने स्वाभाविकच गर्दी होत राहते. शेट्टीही मग परिस्थितीचा आवाका लक्षात घेऊन बळीराजाच्या भावनांना हात घालतात. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या माझ्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्यांला आवर घालण्यासाठी साखरसम्राट एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव सुरू असताना तुमची मदत मोलाची ठरणार आहे असे विधान ते करीत असताना उपस्थित शेतकऱ्यांकडून तुम्ही लढा, आम्ही सोबत आहोत असा प्रतिसाद ऐकू येतो. शेट्टी यांच्या दृष्टीने हाच प्रतिसाद मोलाचा ठरणारा असतो. आक्रमक शेतकऱ्याला आणखी चितवत ते तुम्हीच माझे स्टार प्रचारक आहात आणि तुम्हाला विजयाचा रथ ओढून न्यायचा आहे, असे भावनिक आवाहन ते करतात. त्या सरशी खेडूतांचे हात प्रतिसादासाठी उंचावलेले असतात.     
शेट्टी यांची जन्मभूमी शिरोळ असो की त्यांच्या अंथरुणामुळे चार सुखाचे घास मिळालेली डोंगरकपारीतील गावे असो तेथे शेट्टींचे स्वागत होते. महिला औक्षणासाठी सरसावतात. तर ग्रामस्थ उत्साहाने पदयात्रेत सहभागी झालेले असतात. सोबत कोणताही बडा नेता नसतानाही शेट्टी एकटेच लोकांसमोर जातात. आपल्याला मत कशासाठी देणे गरजेचे आहे हे सांगत राहतात. तर त्यांच्या प्रेमाखातर काही जण नोटांचे हार गळय़ात घालतात. ऊसदर आंदोलनामुळे घरी लक्ष्मी आली, त्याची उतराई म्हणून नोटांचा हार घातला असे हार घालणारा सहजच बोलून जातो. यातूनच शेट्टींवर मनस्वी प्रेम करणाऱ्या ग्रामीण स्थितीचे दर्शन घडते. रात्री मोठय़ा गावात भरणाऱ्या सभेत शेट्टींची तोफ धडाडते.
काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक कशी केली, सहकारसम्राट गलेलठ्ठ कसे झाले, ग्रामीण भागातील दुरवस्था कशी आहे यावर ते नेमकेपणाने बोट ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार बदलण्याचे आवाहन ते करतात. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येण्याची गरज ते व्यक्त करतात. त्याच वेळी सभेला उपस्थित असलेला कोणी तर शेट्टी हेच पुढचे कृषिमंत्री अशी घोषणा देतो आणि उपस्थितांतून टाळय़ांचा गजर होतो. साधेपणाचे दर्शन घडविणारा प्रचार रात्री संपल्यानंतरही त्याच उत्साहात शेट्टी भाजी-भाकरी खात ग्रामस्थ शेतकऱ्यांशी मनमोकळय़ा गप्पाही रंगवतात. त्यांच्या बोलण्यात विजयाची शिट्टी वाजणार याचा आत्मविश्वासही दुणावलेला दिसतो.