शनिशिंगणापूरनंतर आता कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सोमवारी एकमताने घेण्यात आला. अंबाबाई भक्त समिती, श्रीपूजक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस अधिकारी यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यापुढे मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळणार आहे. या निर्णयानंतर काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात गाभाऱ्यात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.
कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या महिला आंदोलकांनी गेल्या आठवड्यात गाभाऱयातच प्रवेशाची मागणी करत तसा प्रयत्न केला. या वेळी अन्य महिला भाविक, कर्मचा-यांनी त्यांना जोरदार विरोध करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यातील महिलांच्या प्रवेशाचा विषय ऐरणीवर आला होता.
राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रवेश दिला जावा, असे आदेश गेल्या आठवड्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिले. राज्य सरकारनेही धार्मिक ठिकाणी पुरूष आणि महिलांना समान संधी दिली जाईल, असे न्यायालयात सांगितले होते. त्यानंतरही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्याविरोधात राज्यातील भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱयावर महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय तेथील विश्वस्तांनी घेतला. त्यानंतर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात का प्रवेश दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now women allowed to ented in gabhara of mahalakshmi temple
First published on: 11-04-2016 at 17:48 IST