छळाचे खोटे गुन्हे दाखल करणा-या महिलांकडून पुरुषांना नुकसान भरपाईचा अधिकार मिळावा, अशा मागणीचा ठराव पुरुष हक्क संरक्षण समितीच्या नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १७व्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. बलात्कार करणा-यांना फाशीचीच शिक्षा द्यावी, असाही ठराव करण्यात आला.
पुरुष हक्क संरक्षण समितीच्या अधिवेशनाचा समारोप आज, रविवारी सायंकाळी करण्यात आला. त्या वेळी विविध ठराव करण्यात आले, त्यात वरील दोन ठरावांबरोबरच पत्नी पतीसमवेत राहात नसेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार असू नये, या ठरावाचाही समावेश आहे. समारोपप्रसंगी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष धमेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, मधुकर भिसे, संतोष शिंदे, नामदेव साबळे, विलास देवरुखकर, विजय खोब्रागडे आदी उपस्थित होते.
या वेळी अ‍ॅड. बाळासाहेब पाटील (सांगली) व प्रताप पंचपोर (पुणे) यांना पुरुषमित्र पुरस्कार तर संगीता ननावरे (पुणे) व तेजस्विनी मरोडे (सोलापूर) यांना कुटुंबसखी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी चव्हाण यांनी पुढील १८वे अधिवेशन नागपूरला घेण्याचे जाहीर केले. आटके यांनी समितीचे कार्य आता गावपातळीपर्यंत विस्तारण्याची आवश्यकता मांडली तसेच संस्कारहीन पिढीमुळे कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागल्याने समितीने आता संस्कार शिबिरे आयोजित करावीत असेही आवाहन केले. समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कराळे यांनी समिती कुटुंबव्यवस्था सारवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.
सकाळी ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘कुटुंबव्यवस्था दुभंगण्यास जबाबदार कोण?’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावरील चर्चासत्रात अ‍ॅड. मरोडे, संगीता ननावरे, स्नेहलता पवार यांनी भाग घेतला, तर अ‍ॅड. बाळासाहेब पाटील यांनी पुरुषांचे हक्क व त्यांचे कायदेशीर कर्तव्य या विषयावर माहिती दिली. पत्रकार भागा वरखडे यांचे ‘स्त्रियांनी कशी लावली संसाराची वाट’ या विषयावर व्याख्यान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obtain compensation from women to men who filed false cases
First published on: 24-11-2014 at 03:45 IST